
खाणीत आढळणारा रॉक फॉस्फेट याच्यापासून सुपर फॉस्फेट हे रासायनिक खत तयार केले जाते. या प्रक्रियेत कॅल्शिअम सल्फेट हा उपपदार्थ तयार होतो, जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट. हे एक चांगले प्रकारचे भूसुधारक आहे. जिप्सममध्ये कॅल्शिअमचे प्रमाण २१ ते २३ टक्के, तर गंधकाचे प्रमाण १३ ते १५ टक्के असते. जमिनीत जिप्सम टाकल्यानंतर रासायनिक अभिक्रिया होऊन चिकण मातीच्या कणावर असलेला सोडिअम क्षार सुटा होऊन कॅल्शिअम मातीच्या कणांवर बसतो आणि सोडिअम सल्फेट क्षार निचरा व्यवस्थेतून पाण्याद्वारे बाहेर पडून चोपण जमीन सुधारण्यास मदत होते . विशिष्ट कालावधीनंतर जिप्सम १२ ते १५ बॅग / एकरी जमिनीत टाकावा त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. जिप्सममुळे चोपण जमीनचे सुधारित जमिनीत रुपांतरीत करता येते.